Saturday, 4 July 2026

आत्मविश्वास

प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा जणू आपल्याला असाध्य रोगच जडला आहे. कुणीतरी आपल्याला मदत करावी, आपला भार हलका करावा अशी इच्छाच मुळात आपण का बाळगावी ? दुसऱ्यावर विसंबून राहाणे ही शुद्ध गुलामगिरी आहे. नशिबावर, कर्मावर, परिस्थितीवर व शेवटी दैवावर दोष लादून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो. पण त्यामुळे साध्य मात्र काहीच होत नाही. ज्याच्या नसानसांत आत्मविश्वास सळसळतो तोच वीरपुरुष आव्हानांचे संधीत रूपांतर करू शकतो. आत्मविश्वास ही काही दैवी देणगी नाही. काळजीपूर्वक, स्वप्रयत्नाने त्याचा विकास करावा लागतो. यशस्वी झालेल्या महान व्यक्तींच्या जीवनात आपल्याला काय आढळते?प्रचंड आत्मविश्वास असूनही त्यांना नेहमीच यश प्राप्त झालेले दिसत नाही. त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागतो. मग साधारण माणूस आणि महान व्यक्ती यांत फरक तो काय? फरक हाच आहे की महान व्यक्ती पराजय किंवा अपयश यांना कधीच अडथळे समजत नाहीत, तर त्यांना यशाचे दुर्गम शिखर गाठण्याच्या मार्गावरील पायऱ्या समजून निरंतर प्रयत्न करीत राहातात. परंतु साधारण व्यक्ती मात्र त्यामुळे निराश होऊन तिथेच आपले प्रयत्न सोडून देते. महान व्यक्तींचा त्यांच्यामध्ये वसत असलेल्या अनंत आत्मशक्तीवर विश्वास असतो व त्या बळावरच ते सर्व अडथळ्यांना पार करून यश प्राप्त करून घेतात. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकात म्हणतो, "अपयश येईल या भीतीने मूर्ख माणूस कामाचा आरंभच करीत नाही, तर एखाद्या कामात थोडासा अडथळा निर्माण झाला की, सामान्य माणूस निराशेपोटी ते काम अर्धवट सोडून देतो. परंतु आत्मविश्वास असणारी व्यक्ती मात्र कितीही संकटे आली, अपयश मिळाले तरी यश मिळेपर्यंत थांबत नाही." (नीतिशतक : २७)

No comments:

Post a Comment

The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill

The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill, 2026 introduces stricter government control over how non-governmental organizations (N...